दशरथ जाधव:

दलितांच्या मुलांना शाळेत सार्वजनिक रित्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करू दिला जात नव्हता तसेच त्यांना इतर सवर्ण मुलांपासून दूर व वेगळे बसवले जात होते परंतु मी हे प्रत्यक्षात बघितले नाही किंवा तसे अनुभवलेही नाही। आमची शाळा भली मोठी एकच खोली असलेली होती आणि त्यात पहली पासून चौथ्या वर्गापर्यंत चे वर्ग घेतले जायचे।

मी यापूर्वीच आमच्या खाण्यापिण्याची अवस्था काय असते यासंदर्भात थोडे से सांगितलेले आहे तपशिलात जायचेच तर रानातला भाजीपाला आणि विशेष करून जून जुलै महिन्यात मेलेल्या जनावरांचे मास हे आमचे आहारातील मुख्य साधने  होती जून आणि जुलै महिन्यात जनावरांना साथीचे रोग व्हायचे व त्यांचे मरण्याचे प्रमाणही जास्त असायचे त्यामुळे या काळात आम्हाला भरपूर खायला मिळायचे त्यापैकी उरलेला काही भाग आम्ही  चान्या करून घरात दोरी बांधून दोरीवर वाळू घालत। कांही वेळेला काट्याच्या फरळावरही सुखण्यासाठी ठेवत। आकाशातील घारी, कावळे व गिधाडे यांच्या पासून संरक्षण करावे लागत असे। पाटलाच्या गोठ्यात मेलेल ढोर दोरीने बांधून गावापासून दुर दलित वस्ती जवळ असलेल्या ढोरकापीत ओढत नेवून त्याचा चमडा काढायचा, त्यानंतर मांग व महार समाजातील लोकांनी ठरलेल्या वाटणी प्रमाणे जनावरांच्या म्रत शरीराचे अवयव काढून घ्यायचे त्यानंतर जे शिल्लक राहिले ते टाकून निघून जायचे। मग जे वतनदार नाहीत, हिस्सेदार नाहीत त्यांची उरलेले मांस, हाडे आपल्याला जास्तीत जास्त कसे मिळविता येतील यासाठी धांदल व्हायची। आम्ही वतनदार नव्हतो, आई वडील मुळचे वाढोणा गावचे आणि माझ्या आजोळी येवून राहिले होते। त्यामुळे आम्ही मैलेल्या ढोरांच्या मांसामध्ये हिस्सेदार नव्हतो।

कातडी काढून नेणाऱ्या व्यक्तीने ती बाजारात विकून मिळालेली रक्कम संबंधित मालकाला नेऊन द्यावी लागत असे वर सांगितल्याप्रमाणे उरलेले मास घेण्यासाठी आम्ही व व आमच्यासारखे इतर लोकही एका बाजूला तर दुसऱ्या बाजूने कुत्रे असायचे। आम्ही कुत्र्याला हाकलून देण्याचा प्रयत्न प्रयत्नात तर कुत्रे इतर कमजोर कुत्र्यांना आणि मोठमोठ्या गिधाडांना पळून लावत। टोपल्यात किंवा हातात मास घेऊन आम्ही पोटाची खळगी भरण्याचे स्वप्न बघत घराकडे निघायचं। अधून-मधून आकाशात घिरट्या घालीत असलेल्या घारी झपाटा मारत आणि क्षणार्धात खाली येऊन जमेल तेवढे हिसकावून नेत त्यामुळे जीवाची बाजी लावून कुत्रे गिधाडे यांच्या तोंडचे काढून घेतलेले मास घरापर्यंत घेऊन जाणे मोठे जिकरीचे असायचे। घरी जेवढे आणले ते घरातील मातीच्या मडक्यात टाकून चुलीवर ठेवले की जिंकलो पण पुढे चालून मडक्यात टाकून चुलीवर ठेवले तरी खायला मिळेलच याची खात्री राहिली नाही। आरपीआयच्या कार्यकर्त्यांना कळले की ते मडक्यात रॉकेल टाकायचे किंवा मडके फोडून टाकायचे त्यातूनही अनेकांनी मार्ग काढला आपल्या शेजारच्या पावण्या-रावळ्याच्या गावात जाऊन चार दोन दिवस मुक्काम करायचा तिथे खायचे आणि सोबत घेऊनही यायचे नंतर तेही गावे बंद झाले। मृत जनावरे ओढणे कातडी काढणे व मांस खाण्यास पूर्णपणे बंदी झाली मांग महार मेलेली गुरेढोरे ओढून गावाबाहेर घेऊन जाऊ शकत नव्हते। त्यामुळे नाईलाजाने मेलेली जनावरे मालक किंवा पाटील बैलगाडीत घालून शेतात घेऊन जात व खोल खड्डा करून पुरून टाकीत असत। त्यामुळे गावागावांमधून मेलेल्या जनावरांचे मांस खाणे कायमचे बंद झाले।

मजुरीत मिळालेल्या ज्वारीत आठ दहा जणांच्या कुटुंबाची भूक भागविण्यासाठी नवीन पर्याय शोधावे लागले। रानटी पारेभाज्यांचा जास्तीत जास्त वापर सुरू झाला। ज्वारीच्या पिठात शिजवलेला अंबाडीचा पाला मिसळला की चार भाकरीच्या पिठात आठ ते नऊ भाकरी व्हायच्या मग कुटुंबातील जवळपास सगळ्यांची पोटाची खळगी भरायचे। पाला न मिळणाऱ्या दिवसात ज्वारी भरडून कन्या करायच्या आणि त्यात भरपूर पाणी टाकून शिजवले की मातीची प्लेट येळणी किंवा जर्मन ची प्लेट भरून जायची। शेतात मजुरीला गेले की महिला अंबाडी, पाथर, कुंजर, घोळ, दगड शेपू, तरवटा, कुर्डू अशा शेतातून काढून टाकायच्या रानटी भाज्या तर रब्बीच्या मोसमात  हरभऱ्याची भाजी, करडीची भाजी अशा भरपूर आणीत व घरी येऊन निवडत बसत।

मेलेल्या जनावरांचे मांस खाणे बंद झाले तरी कापलेल्या जनावराचे मांस स्वस्तात मिळत असे। एक तर बाजारच्या दिवशी मिळायचे किंवा खाटीक घोड्यावर बसून गावात घेऊन यायचा। मांगवाडा किंवा महार वाडा हेच त्याची मटणाचे दुकान लावायची जागा। खाटकाला द्यायला पैसे कुठले; तर मजुरीत मिळालेली ज्वारी, तूर, कापूस, भुईमुगाच्या शेंगा अशा वस्तू घेऊन तो मटन द्यायचा। येताना घोड्यावर मटन; तर जाताना शेतमाल।

आम्ही वतनदार नसल्याने मांगकीसाठी पाटलाची घरेही आम्हाला नव्हती। आमच्या आजीकडे असलेल्या मांगकीच्या चार घरांपैकी दोन पाटलाची घरे आम्हाला मांग की साठी मिळाली होती। मांग म्हणजे बिना पैशाचा कायमचा शेतकरी आणि घरगडी.पण दोन वाड्याची मांगकी असल्याने माय व दादांना(वडील) सतत काम असायचे बिलकुल फुरसत नव्हती. तसे कुटुंब जेमतेम भागेल अशी मिळकत होती। बाकीचे लोक पोरगा थोडाही कळता झाला की पाटलाची जनावरे सांभाळायला लावित पण आमच्या दादांनी चार मुलं असूनही एकालाही जनावर राखायला पाटलाकडे ठेवले नाही। दादा तिसरीपर्यंत मोडी शिकलेले होते। मोठे भाऊ नववी नापास असूनही शिक्षक म्हणून परभणी जिल्ह्यात कामाला लागले होते। नंतर त्यांनी बीटीसी व दहावी पास नोकरी करत करत झाले तरीही दादांची मांग की काही सुटली नाही। मी लहान असताना माय बऱ्याच दिवसाच्या आजाराने उपचाराविना औषध पाण्याविना वारली। मला थोडे-थोडे कळत होते। माझ्यापेक्षा दोन मोठे व एक लहान भाऊ, दोन मोठ्या बहिणी, एकीचे लग्न झालेले आणि लहान भावा पेक्षा लहान सर्वात छोटी बहीण। ती एवढी लहान होती की माय वारली तेव्हा ती मायचे दूध पीत होती। काही दिवसानंतर मोठ्या बहिणीचे ही लग्न झाले आणी दादांच्या हातावर पिठ आले।

गावाप्रमाणे आमच्याही गावात मांग बाजारचा ताफा होता त्यात माझे वडील सनई, ढोल किंवा हलगी वाजवीत असत; तर चुलते सूर वाजवीत। इतर साथीदार आणखी एक सनई ढोल पडघम वाजविणारे लोक होते। लग्नात वाजविण्यासाठी ते सुपारी बोलत। म्हणजे पूर्ण लग्न विधी होईपर्यंत दोन ते तीन दिवस वाजल्यानंतर त्यांची संबंधिताशी बोलणी झाल्याप्रमाणे त्यांना पैसे मिळायचे। आपसात सर्वजण समान वाटून घ्यायचे त्यांना जेवायलाही मिळायचे। आम्ही बाजेवाल्याबरोबर ध्यान ठेवून राहायचं आणि त्यांच्याबरोबर जेवायला बसायचं। लग्नातील गोडधोड खायला मिळायचे। आमच्या घरात सनई, ढोल आणि हलगी असे तीन वाद्य होती। माझा छोटा भाऊ ढोल व हलगी वाजवायला शिकला पण मला कधी ती वाद्य वाजविण्याची इच्छा झाली नाही व ते मला जमलं ही नाही। आताही मला वाजवता येत नाही। मयत व्यक्तीच्या अंत्यविधीच्या वेळी सुध्दा माझे वडील व त्यांचे साथीदार वाजवायला जात असत पण यावेळी त्याना मयताचे नातेवाईक व इतर लोकांनी टिळा म्हणून दिलेल्या प्रत्येकी रू। एक प्रमाणे जमलेल्या पैशातून कांही पैसे मिळत।

Author

Leave a Reply

Designed with WordPress

Discover more from युवानिया ~ YUVANIYA

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading