दशरथ भाऊ:

आज पासून मी माझ्या जीवनातील वेगवेगळे प्रसंग, अनुभव आणि घडामोडी, तसेच माझे सामाजिक  परिवर्तनाच्या लढ्यातील योगदान; माझे सहकारी, शासकीय अधिकारी, राजकीय, नेतेमंडळी व सर्वसामान्य लोक जे शोषित आहेत, वंचित आहेत, त्यांच्यासोबत केलेले काम, त्यांच्याकडून शिकलेल्या गोष्टी इत्यादी बाबत लिहिण्याचे ठरविले आहे.

सुरुवात करताना मी माझ्या बालपणात डोकावून इच्छितो. मला जसे समजायला लागले तेव्हा मी साधारणपणे दुसरी किंवा तिसऱ्या इयत्तेत असेल. आमची वस्ती म्हणजे  मांगवाडा आणि आमच्या बाजूला असलेला महारवाडा या दोन्ही वस्त्या गावाच्या बाजूला पूर्व दिशेला गावापासून काही अंतर ठेवून असायच्या. याचे कारण मला खूप दिवसानंतर समजले कि आम्ही दलित आहोत, अस्पृश्य आहोत म्हणून गावापासून आमच्या वस्त्या अंतरावर होत्या. त्याच बरोबर हवा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते, पूर्वेकडे आमची घरे  असल्याने आम्हाला आणि आमच्या वस्त्यांना स्पर्श करून जाणारी हवा गावातील उच्च जातीच्या लोकांना लागणार नाही तसेच त्यांना आमचा विटाळ होणार नाही अशी व्यवस्था होती.  जर आमच्या वस्त्या पश्चिम किंवा इतर दिशांना झाल्या तर या उलट परिस्थिती होईल, म्हणजेच आम्हाला आणि आमच्या वस्त्यांना स्पर्श करून जाणारी हवा  गावातील उच्च जातीच्या लोकांना लागेल व ते बाटतील, अपवित्र होतील, त्यांना विटाळ होईल म्हणून गावांची व्यवस्था व ठेवण त्या पद्धतीने केलेली असायची. हे असे केवळ आमच्याच गावात नव्हे  तर सर्वच गावातून ही व्यवस्था होती. 

मी भूमिहीन शेतमजूर असलेल्या  कुटुंबात जन्माला आलो त्यामुळे घरात अठरा विश्वे दारिद्र्य असणे स्वाभाविक. आमच्या छोट्या-मोठ्या झोपड्या म्हणजेच आमचे घर. या घराला दरवर्षी पावसाळ्यापूर्वी रानातून जंगलातून पाटलाच्या शेतातून काठ्या, बंधाटया, उसाचे पाचट आणि वरका इत्यादी आणून डाग डूजी करावी लागत असे. नंतर उन्हाळ्याच्या जवळपास त्यातील पानांचा भाग गळून जात असे व मोठे मोठे भगदाड पडत असत. त्यातून चिमण्या कावळे यासारखे पक्षी इकडून तिकडे आरामशीर जाऊ शकत असत. याउलट गावातील पाटलांची घरे दगडा मातीने बांधलेली पक्की घरे असायची त्यांची घरे चिरेबंदी असायची. त्यांच्या गुराढोरांना सुद्धा चांगली टीनचे पत्रे असलेली गोठे असायचे. म्हणजेच गावातील पाटलांच्या जनावरांना चांगला निवारा आणि आम्हा दलितांना राहायला नीट व चांगली झोपडी नाही अशी विदारक अवस्था गावागावातून अस्तित्वात होती. एका बाजूला राहायला नीट घर नाही तर दुसऱ्या बाजूला खाण्यासाठी पुरेसे अन्न नाही, अंगभर कपडे नाहीत, मुला बाळांना शिक्षण देण्यासाठी आर्थिक बळ नाही. मुलं सोबत काम केले तर अर्धी भाकर आगाऊ मिळेल या आशेने लहान मुलांनाही सोबतच कामाला ज़ुम्पले जायचे. लहान वयातच पाटलांची गुरे सांभाळण्याची जबाबदारी अंगावर पडायची किंवा आई बहिणी बरोबर पाटलांच्या जनावरांचे शेण काढणे, गोठ्याची व घरांची झाडलोट करून साफसफाई करणे इत्यादी कामे करावी लागत असत. पहिल्या चार-पाच वर्षापर्यंत कोणत्याही दलित कुटुंबातील मुला मुलींना कपडे नसत. ही लेकरे उघडी नागडी घरात व परिसरात फिरत असत. त्यानंतर मात्र एक खाकी जाडी जुडी चड्डी आणि सगळ्यात स्वस्त असलेल्या कपड्यांचा शर्ट, असा कपड्यांचा एकच जोड वर्षभर घालायचा. फाटलं की त्याला दोरा घालायचा किंवा इतर जुन्या फाटक्या कपड्यातला थोडा बरा असलेला भाग त्याला जोडायचा. त्याला आमच्या भाषेत  ठिगळ असे म्हणत. 

गावात जी पाण्याची व्यवस्था होती ती गावातील लोकांसाठी वेगळी आणि मांग महार या लोकांसाठी वेगळी असायची. कोणत्याही परिस्थितीत दलितांनी पाटलांच्या पानवठ्यावर, विहिरीवर, आडावर पाणी भरू नये असा दंडक होता. नदीवर सुद्धा पाणी भरण्यासाठी वेगवेगळी ठिकाणी निश्चित करण्यात आलेली असायची. नदीच्या वरच्या पात्रात गावातील सवर्ण उच्च जातींनी पाणी भरायचे तर दलितांनी खालच्या भागातील पाणी भरायचे. महिलांनी कपडे धुण्यासाठी सुद्धा असाच नियम होता. प्रवाहाच्या खालच्या बाजूला दलितांनी कपडे धुवावेत असा अलिखित नियम होता. हा नियम मोडल्यास खूप मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचाराला दलितांना सामोरे जावे लागत असे, त्यामुळे हा नियम कोणीही मोडत नसत. 

त्याचबरोबर मांग आणि महार समाजाला नेमून दिलेली मानकी आणि महारकी ची कामे करणे बंधनकारक होते. त्या बदल्यात पाटील जे अन्नधान्य देईल किंवा शिळी भाकरी देईल त्यावर आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे एवढेच त्यांच्या हातात होते. कधीकाळी बांधबंदिस्ती, रस्ता,छोटी-मोठी तळी इत्यादी सरकारी कामे निघाली तर दिवसाला एक रुपया ते दीड रुपया अशी मजुरी मिळायची. त्यातूनच कुटुंबाला लागणाऱ्या इतर वस्तू घेणे सोयीचे व्हायचे. शेतातील कामे मांगकी व महारकी या वेठबिगारी पद्धतीप्रमाणे करावयाची असल्याने त्यासाठी कोणताही आर्थिक मोबदला दिला जात नसे. केवळ मोबदला म्हणून दिलेले थोडेफार धान्य हेच एकमेव उत्पन्न होते. त्याशिवाय शेतात  धान्य काढल्यानंतर चुकून शिल्लक राहिलेले थोडेफार धान्य एक एक वेचून घ्यायची परवानगी होती. तसेच धान्याची रास करताना मातीत मिसळलेले थोडेफार धान्य ज्याला आम्ही मातेरे म्हणतो ते सुद्धा आमचाच अधिकार होता. ते मात्र घरी आणून त्यातील अधिक प्रमाणात असलेली माती पाण्याने धुऊन बाजूला काढून त्यातून निघालेले धान्य कुटुंबासाठी आम्ही वापरत असू.

जवळपास आमच्यासारखेच सारखी परिस्थिती ही बारा बलुतेदार जसे की सुतार, लोहार, धोबी, कुंभार, चांभार अशा मंडळीची होती. फरक एवढाच की त्यांना जातीयता व अस्पृश्यतेचे चटके बसत नव्हते.

शाळेत जाणाऱ्या मुलांची संख्या दलित आणि बारा बलुतेदार कुटुंबांची फारच कमी होती परंतु इतर ठिकाणाप्रमाणे आमच्या गावात शाळा शिकणाऱ्या दलितांच्या मुलांना वेगळे बसवले जात नव्हते. शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाच नव्हती त्यामुळे पाण्याचा काही प्रश्न नव्हता. आम्ही ऐकून आहोत की इतर ठिकाणी दलितांच्या मुलांना शाळेत सार्वजनिक रित्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करू दिला जात नव्हता. तसेच त्यांना इतर सवर्ण मुलांपासून दूर व वेगळे बसवले जात होते परंतु मी हे प्रत्यक्षात बघितले नाही किंवा तसे अनुभवलेही नाही. आमची शाळा भली मोठी एकच खोली असलेली होती आणि त्यात पहली पासून चौथी  वर्गापर्यंतचे वर्ग घेतले जायचे.

क्रमशः अगले अंक में 

Author

Leave a Reply

Designed with WordPress

Discover more from युवानिया ~ YUVANIYA

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading