महाराष्ट्र राज्यातील जादूटोणा विरोधी कायद्याची पार्श्वभूमी आणि यशस्वीता

डॉ. सुदेश घोड़ेराव:

साधारणपणे 1990 च्या सुमारास डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रमुख नेतृत्वातून आणि माजी न्यायमूर्ति चंद्रशेखर धर्माधिकारी, एडवोकेट भास्करराव मिसर यांचे प्रयत्नातून जादूटोणा विरोधी कायद्याचे  प्रारूप तयार केले गेले. हा सुरवाती चा कायदा खूपच सखोल आणि विविध अंधश्रद्धांच्या प्रकरणा विरोधात कठोर भूमिका घेणारा होता. अनेक कलमांचा त्यात समावेश होता. परंतु कायदा मंजूरीच्या प्रक्रियेत यातील अनेक कलमे वगळावी लागली. अगदी सुरवातीपासूनच कायद्याला विरोध होत होता. याचे प्रमुख कारण म्हणजे अनेक प्रकारचे गैरसमज.

या कायद्याबाबत अनेक हितसंबंधी मंडळींनी अपप्रचार देखील मोठ्या प्रमाणावर केला होता. प्रत्यक्षात ज्या लोकांचा या कायद्याला विरोध होता, त्यांनी हा कायदा संपूर्णपणे कधी वाचला असेल असे वाटत नाही. कारण विरोध करणार्यांच्या मते या कायद्यामुळे सत्यनारायणाच्या  कथेला विरोध, भजन मंडळींना विरोध, हिंदू धर्मापुररती सीमित कार्यकक्षा असे अनेक गैरसमज होते. प्रत्यक्षात ज्यावेळेस एखादा फौजदारी स्वरूपा चा कायदा निर्माण केला जातो तेंव्हा तो नेहमीच धर्मनिरपेक्षअसतो. त्यात धर्म, जात, पंथ येत नसतात. म्हणून हा कायदा सुरवातीपासूनच धर्मनिरपेक्ष होता. 

संविधाना मध्ये समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे दोन शब्द समाविष्ट आहेत. राजकीय, सामाजिक व आर्थिक शोषणापासून मुक्ति समाजवादी समाजाची व्याख्या आहे. ज्या ज्या गोष्टींद्वारे  मानवाचे अथवा समाजा चे शोषण होते ते काढून टाकणे हे  शोषणमुक्त समाजा  साठी आवश्यक आहे. म्हणूनच अंधश्रद्धा विरोधी कायदा हा अन्यायविरोधी आणि शोषणमुक्त समाजाच्या  निर्मिती साठी आवश्यक बनतो. अर्थात फक्त कायदे करून सर्व समस्या दूर होत नाहीत परंतु कायद्याच्या मदतीने, लोकशिक्षणाच्या माध्यमातून शोषण मुक्त समाज निर्माण होऊ शकतो. गरीबी आणि अज्ञान यांचा गैरफायदा घेऊन लोकांचे शोषण काही लोक करतात व त्याला प्रतिबंध करणे ही कायद्याची भूमिका असते. गरीब, महिला, आदिवासी यांचे अंधश्रद्धेपोटी होणारे शोषण रोखणे या साठी हा कायदा निर्माण झाला आहे. 

या कायद्यातील एक ही शब्द किंवा एक ही कलमअसे नाही कि जे एका विशिष्ट धर्माच्या विरोधात आहे. हा कायदा हिंदू धर्म विरोधात आहे असे  म्हणणार्या लोकांची कीव करावीशी वाटते. सत्य, अहिंसा, उपासना, चांगुलपणा, नीति ही  प्रत्येक धर्माची शाश्वत मूल्ये आहेत. परंतु ही मूल्ये वजा करून उरलेल्या कर्मकांडाला जर धर्म समजले जात असेल तर त्या कर्म कांडाला विरोध करणारा हा कायदा आहे. कायद्यात पूर्वी असलेला भोंदूबाबा या शब्दाला वारकर्यांनी आक्षेप घेतला होता. त्यांना वाटले की हा फक्त हिंदू धर्माशी संबंधित आहे आणि क्रिश्चियन, मुस्लिम धर्मांना तो लागू होणार नाही. परंतु विरोध नको म्हणून तो शब्द काढून टाकला. ज्या ज्या शब्दां मधुन विशिष्ट धर्माच्या भावना दुखावल्या जातील असे वाटत होते ते शब्द कायद्याच्या मसुद्यातून काढून टाकले. डाॅ.नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येनंतर तातडीने महाराष्ट्र  सरकारने जादुटोणा विरोधी कायद्याचा वटहुकूम मंजूर केला आणि पुढील हिवाळी अधिवेशना दरम्यान एकमताने कायद्यात रूपांतर केले. कायदा निर्मिती नंतरच्या पुढील जवळपास नऊ वर्षाच्या कालावधीत 600 पेक्षा अधिक गुन्हे विविध  पोलीस स्टेशनमध्ये  नोंदविले गेले. त्यातून काही खटल्यांचा निकाल देखील  लागला आणि दोषीना कायद्यात  नमूद असल्याप्रमाणे  शिक्षा देखील झाली. सर्व जाती आणि धर्मातील  गुन्हेगुगारी विषयक प्रकरणे या कायद्याच्या माध्यमातून न्यायप्रविष्ट आहेत. या कायद्यात पुढील घटनांना अंधश्रद्धा असे समजले आहे. आणि त्या नुसार विविध कलमे सांगितली आहेत. 

१. भूत उतरविण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीला, दोराने किंवा साखळीने बांधून ठेऊन तिला मारहाण करणे, काठीने किंवा चाबकाने मारणे, तिला पादत्राणे भिजवलेले पाणी प्यायला लावणे, मिरचीची धुरी देणें, त्या व्यक्तीला छताला टांगणे, त्याला दोराने किंवा केसांनी बांधणे, किंवा त्या व्यक्तीचे केस उपटणे, व्यक्तीच्या शरीरावर किंवा अवयवांवर तापलेल्या वस्तूंचे चटके देऊन इजा पोहोचविणे, व्यक्तीला उघड्यावर लैगिक कृत्य करण्याची जबरदस्ती करणे, व्यक्तीवर अमानुष कृत्य करणे, व्यक्तीच्या तोंडात जबरदस्तीने मूत्र किंवा विष्टा घालणे किंवा यासारख्या कोणत्याही कृती करणे.

२. एखाद्या व्यक्तीने तथाकथित चमत्कारांचा प्रयोग प्रदर्शित करून, त्याद्वारे आर्थिक प्राप्ती करणे ; आणि अशा तथाकथित चमत्कारांचा प्रचार व प्रसार करून लोकांना फसवणे, ठकवणे आणि त्यांच्यावर दहशत बसविणे.

३. अलौकिक शक्तीची कृपा मिळविण्याच्या हेतूने, ज्यामुळे जिवाला धोका निर्माण होतो किंवा शरीराला जिवघेण्या जखमा होतात अशा अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथांचा अवलंब करणे; आणि अशा प्रथांचा अवलंब करण्यास इतरांना प्रवृत्त करणे, उत्तेजन देणे किंवा सक्ती करणे.

४. मौल्यवान वस्तू, गुप्त धन आणि जलस्त्रोत यांचा शोध घेण्याच्या बहाण्याने वा तत्सम कारणाने करणी, भानामती या नावाने कोणतेही अमानुष, अनिष्ट व अघोरी कृत्य आणि जादूटोणा करणे, आणि जारणमारण यांच्या नावाने व त्यासारख्या अन्य कारणाने नरबळी देणे, किंषा देण्याचा प्रयत्न करणे, किंवा अशी अमानुष कृत्ये करण्याचा सल्ला देणे, त्याकरिता प्रवृत्त करणे, अथवा प्रोत्साहन देणे.

५. आपल्या अंगात अतिंद्रिय शक्ती असल्याचे भासवून अथवा एखाद्या व्यक्तीत अतिंद्रिय शक्ती संचारली असल्याचा आभास निर्माण करून इतरांच्या मनात भीती निर्माण करणे किंवा त्या व्यक्तीचे सांगणे न ऐकल्यास वाईट परिणाम होतील अशी इतरांना धमकी देणे, फसवणे व ठकवणे.

६. एखादी विशिष्ट व्यक्ती करणी करते, जादूटोणा करते किंवा भूत लावते किंवा मंत्रतंत्राने जनावरांचे दूध आटवते, असे सांगून त्या व्यक्तीबाबत तशी समजूत निर्माण करणे, किंवा त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती अपशकुनी आहे किंवा रोगराई पसरण्यास कारणीभूत ठरणारी आहे असे भासवणे, अशा व्यक्तीचे जगणे मुश्किल करणे, त्रासदायक करणे वा कठीण करणे; एखादी व्यक्ती सेतान असल्याचे किंवा ती सैतानाचा अवतार असल्याचे जाहीर करणे.

७. जारणमारण, करणी किंवा चेटूक केल्याच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीला मारहाण करणे, तिची नग्नावस्थेत धिंड काढणे, किंवा तिच्या रोजच्या व्यवहारांवर बंदी घालणे.

८. मंत्राच्या सहाय्याने भूत पिशाच्चांना आवाहन करून, किंवा भूत पिशाच्चांना आवाहन करीन अशी धमकी देऊन सर्वसामान्य जनतेच्या मनात घबराट निर्माण करणे, एखाद्या व्यक्तीला शारीरिक इजा होण्यास भूताचा किंवा अतिंद्रिय शक्तीचा कोप असल्याचा समज करून देणे, आणि तिला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून, त्याऐवजी तिला अमानुष, अनिष्ट व अघोरी कृत्य वा उपाय करण्यास प्रवृत्त करणे, जादूटोणा अथवा अमानुष कृत्ये करून किंवा तसा आभास निर्माण करून एखाद्या व्यक्तीला मृत्यूची भीती घालणे, शारीरिक वेदना करण्याची किंवा तिचे आर्थिक नुकसान करण्याची धमकी देणे.

९. कुत्रा, साप किंवा विंचू चावल्यास एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून, त्याऐवजी मंत्रतंत्र, गंडेदोरे किंवा यासारखे उपचार करणे.

१०. बोटाने शस्त्रक्रिया करून दाखवतो असा दावा करणे किंवा गर्भवती स्त्रीच्या गर्भाचे लिंग बदल करून दाखवतो असा दावा करणे.

११. (क) स्वतःत विशेष अलोकीक शक्ती असल्याचे अथवा कुणाचातरी अवतार असल्याचे वा स्वतःच पवित्र आत्मा असल्याचे भासवून किंवा त्याच्या नादी लागलेल्या व्यक्तीस पूर्वजन्मी तू माझी पत्नी, पती वा प्रेयसी, प्रियकर होता असे सांगून, अशा व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवणे;

(ख) मूल न होणाऱ्या स्त्रीला अलौकिक शक्ती द्वारा मूल होण्याचे आश्वासन देऊन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवणे. 

१२. एखाद्या मानसिक विकलांग व्यक्तीमध्ये अलौकिक शक्ती असल्याचे भासवून त्या व्यक्तीचा वापर धंदा किंवा व्यवसाय यासाठी करणे.

फीचर्ड फोटो आभार: डीएनए इंडिया

Author

One comment

  1. 👍👍समाज फक्त शिक्षीत होऊन चालणार नाही. श्रधा मुक्त पाहिजे. सांगलीत एका पशू वैद्यकिय पेशा असलेल्या घराणाचा शेवट अंधश्रध्देचे बळी मिळवितो हे अत्यंत लान्छनास्पद आहे. अंधश्रध्देमुळे आर्थिक फायदे घडवून आणनारे बुवा लोक समाजात वाढले का?😊🙏

Leave a Reply